नवीन वर्षाचे स्वागत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. मात्र नंदुरबार शहरात शालेय विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत आगळ्या-वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने केले आहे.
शहरातील श्रीमती एच. गो. श्रॉफ विद्यालय यांच्या पुढाकारातून नवीन वर्षाला आरोग्यदायी वर्ष बनवण्याचा संकल्प करण्यात आला. पहाटेच्या शांत वातावरणात सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तब्बल ८५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत नवीन वर्षाचे स्वागत केले.
विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत शिस्तबद्ध आणि गोलाकार रचनेत विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार सादर केले. या दृश्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाला नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मित्तली सेठी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
नवीन वर्षात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण करणे, योग व व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
सामूहिक सूर्यनमस्काराच्या या उपक्रमामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक, शिस्तबद्ध आणि आरोग्यदायी संदेशासह झाली आहे.