12 Sep गौरी-गणपती व दिवाळी निमित्त 100 रुपयांत मिळणार ‘आनंदाचा शिधा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार : जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 66 हजार 90 पात्र शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या गौरी-गणपती व दिवाळी सणानिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 4 शिधाजिन्नसांचे संच असलेला ‘आनंदाचा शिधा’ वाटप केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्या व्यतिरिक्त गणपती आणि दिवाळीमध्ये पुन्हा आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल मिळणार आहे. गोरगरीब कुटूंबीयांसाठी हा आनंदाचा शिधा आधार ठरणार आहे. गौरी-गणपतीच्या दिवसांत जिल्ह्यातील पात्र रेशन कार्डधारकांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेल, डाळी, साखरेचे भाव वाढले की, सर्वसामान्य कुटूंबांची अडचण होते. याबात मंत्रिमंडळ निर्णय झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधाचा लाभ होणार आहे. याबाबत पुरवठा विभागाकडून वाटप सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
हे असतील पात्र
अंत्योदय, प्राधान्य कुटूंब, पात्र कार्डधारकांना याचा लाभ मिळणार असून आनंदाचा शिधा वाटपासाठी जिल्ह्यात पुरेसा धान्याचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा विभागाकडून मिळणाऱ्या या आनंदाच्या शिधामध्ये 100 रुपयात रेशनकार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ व एक लिटर खाद्यतेल मिळणार आहे. हे साहित्य खुल्याबाजारात किमान 250 ते 280 रुपयांचे आहे. गौरी-गणपती उत्सवनिमित्त वितरीत करावयाचा संच 01 सप्टेंबर, 2023 पासुन सुरू झाला असून 30 सप्टेंबर, 2023 पर्यंत तो मिळू शकेल. तसेच दिवाळी सणानिमित्त वितरीत करावयाचा संच 15 ऑक्टोंबर, 2023 पासून दिवाळी सणापर्यंत ( 12
नोव्हेंबर, 2023) मिळेल.
जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार 90 पात्र कुटूंबाना आनंदा शिधा वाटपाचा लाभ मिळणार आहे. गौरी-गणपतीच्या दिवसात जिल्ह्यातील रेशनकार्डधारक कुटूंबांना 100 रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’ थेट रेशन दुकानांमधून मिळणार आहे. हे संच पुरवठादारांकडून संबंधित तालुका गोदामात पुरवठा होताच रेशन दुकानदारांमार्फत पात्र लाभार्थ्यांना मिळू शकतील. जिल्हयातील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजनेतील पात्र कार्डधारक लाभार्थ्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानातुन ‘आनंदाचा शिधा’ संच प्राप्त करुन घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी
मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दृष्टिक्षेपात वितरण
🎁 नंदुरबार : 58 हजार 154
🎁 नवापूर : 48 हजार 274
🎁 शहादा : 64 हजार 379
🎁 तळोदा : 28 हजार 279
🎁 अक्कलकुवा : 40 हजार 655
🎁 अक्राणी : 26 हजार 349
🎁 एकूण : 2 लाख 66 हजार 90
No Comments